Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पाऊस वेड्यांचा पावसाळा !!
भटकंती लेख

पाऊस वेड्यांचा पावसाळा !!

rainकवीच्या लेखणीतून कविता होऊन बाहेर पडणारा पावसाळा आला,
चिमुकल्यांच्या हातून होडी बनून पाण्यात वाहणारा पावसाळा आला,
मित्रांच्या सोबत चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा पावसाळा आला,
आणि प्रेयसीसोबत समुद्रकिनारी भिजणारा पावसाळा आला……. 

आणखी बऱ्याच प्रकारे आपल्याला या ऋतूचे वर्णन करता येईल. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आपण या ऋतूला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलेले असते. ह्या पावसाळ्याची तयारी आपण पावसाळा सुरु होण्याच्या आधीपासूनच करत असतो. पावसाळ्याची शॉपिंग ते बाहेर फिरायला जाण्याची ठिकाणं ठरवण्यापर्यंत सगळे काही ठरवून आपण मोकळे होतो. एखादा दिवस मुंबई जवळ एखाद्या सुंदर अशा हिल स्टेशन वर किंवा धबधबा असलेल्या ठिकाणी जाण्याचा किंवा ट्रेकिंग ला जाण्याचा  आपण बेत आखतो. परंतु तिथे गेल्यावर आपला पार हिरमोड होतो कारण आपल्यासारखेच खूप जण असा बेत आखून आलेले असतात. आणि त्या शांत ठिकाणी जणू जत्राच भरलेली असते. अशा वेळी आपण त्या गर्दीत धिंगाणा घालण्याव्यातिरिक्त काहीही करू शकत नाही. 
          rain 4 प्रत्येकाची पावसाळ्याचा आनंद घेण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पावसाळ्याचा आनंद कसा घ्यावा हे व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते. काही लोकांना मित्रांसोबत कांदाभजी आणि चहा पिण्यात आनंद मिळतो, काही जण आपली गाडी किंवा बाईक काढून लांब रपेट मारून आपला पावसाळी आनंद उपभोगतात. काही जण तर चक्क चिखलातदेखील फुटबॉल खेळतात. पण काहीही म्हणा हा आल्हाददायी ऋतू निसर्गासोबत आपल्या मनाला देखील ताजेतवाने करतो.  बाईक चालवताना अंगाला टोचणारे पावसाच्या पाण्याचे थेंब, फुटबॉल खेळताना अंगावर उडणारा चिखल, पावसामुळे येणारा मातीचा गंध, या गोष्टी तुमच्यातला जिवंतपणा तुम्हाला दाखवून देतात. 
      
    मुंबईत मनोरी बीच, उत्तन बीच, पवई तलावामागील उद्यान, हि ठिकाणं त्या मानाने काहीशी गर्दीचा स्पर्श न झालेली आहेत. त्या व्यतिरिक्त सर्वांच्या आवडीचे मरीन ड्राईव्ह, जुहु बीच, हँगिंग गार्डन, नॅशनल पार्क हि काही प्रसिध्द स्थळं आहेत. मुंबई बाहेर फिरायचच असेल तर येउर नॅशनल पार्क, नेरळ, सज्जनगड, तुंगारेश्वर, एलिफंटा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
          
पावसाळा म्हटले कि पावसाळ्याची खरेदी येते. ज्याच्या यादीत सर्वात वरती असते ती रंगबिरंगी छत्री. आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत, पारदर्शी, प्रिंटेड, कलाकारांचे फोटो असलेल्या, पावसात रंग बदलणाऱ्या काही ठिकाणी तर आपल्या मागणीनुसार देखील छत्र्या प्रिंट करून मिळतात. छत्र्यंासोबत पावसाळी चप्पलदेखील आलीच. बाईकवेड्यांसाठी रंगीबेरंगी विंडशिटर देखील उपलब्ध असतात. आणि पावसाळ्यासाठी बहुदा लोक स्ट्रीट शॉपिंगलाच प्राधान्य देतात. कारण अशा ठिकाणी खूप पर्याय उपलब्ध असतात आणि तेही अतिशय स्वस्त दरात. आणि तसही पुढल्या वर्षी शॉपिंगची मज पुन्हा अनुभवायची असते त्यामुळे वस्तू टिकली नाही तरी त्यात गैरसोय वाटत नाही. अशी पावसाळी शॉपिंग करण्यासाठी मालाडचं नटराज मार्केट, बोरीवलीचं मार्केट, लिंकिंग रोड हे उत्तम पर्याय आहेत. 
       
  rain 2तसे पाहता पावसाळा हा घरच्या गॅलरीत बसून चहा आणि कांदाभाजीवर ताव मारण्याचा ऋतू कारण बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यालायक असतील याची शाश्वती नसते आणि उगाच आजाराला निमंत्रण कशाला द्या? परंतु आपल्या पाऊसवेड्या मित्रांची कहाणी काही औरच आहे. यांना पावसात भिजून भुट्टा (भाजलेले मक्याचे कणीस) खाण्यात मजा येते, यांना कळकट अशा वाटणाऱ्या चहाच्या कपातून टपरीवर पावसाचे थेंब चहात पडत असताना चहा पिण्यात मजा येते, पावसात २-३ तास भिजून किंवा चिखलात खेळून कडकडून भूक लागल्यावर अण्णाकडचा गरमागरम वडापाव आणि भजी खायला मजा येते. आणि या पाऊसवेड्यांची हि खाण्यापिण्याची ठिकाणं ठरलेली असतात बरं का. यांना माहित असते कि कोणत्या टपरीवर आल्याचा फक्कड चहा मिळतो. कोणत्या ठिकाणाची भाजी किंवा वडापाव उत्तम असतो.  पावसाळा येऊ लागला कि भुट्टा, चण्याची तिखट भेल, अशा वेगवेगळ्या पावसातही खाद्यपदार्थांच्या गाड्यांची संख्या वाढू लागते. जुहु बीच मरीन ड्राईव्ह अशा ठिकाणी तर अशा गाड्यांची फारच रेलचेल असते. 
        
कधी बाईकवर बसून पावसात ६० च्या स्पीडला बाईक चालवली आहे? कधी चिखलात सायकल चालवण्याचा प्रयत्न केला आहे? मित्रांसोबत भर पावसात सायकलीची शर्यत लावली आहे? कुणीही शहाणा व्यक्ती पाय ठेवणार नाही अशा पावसाच्या पाण्याच्या डबक्यात उद्या मारल्या आहेत? जर उत्तर नाही असेल तर तुम्ही पावसाच्या खऱ्या आनंदाला मुकला आहात. मग आत्ताच जा बाहेर आपल्या खास किंवा जुन्या मित्रांसोबत आणि हि मजा लुटून या कारण पावसाची मजा या व्यतिरिक्त दुसरी ती काय? बाईक वरून फिरताना अंगाला टोचणारे पावसाचे थेंब तुम्हाला वेगळाच अनुभव देतात. बाजूची गाडी जेंव्हा चिखल उडवून जाते तेंव्हा रागवायचं सोडून तुम्ही आपापसातच हसता. चिखलात रुतलेल्या सायकलीला चालवून चिखलाबाहेर काढताना तुम्हाला तुमचा बालपण नाही आठवलं तर नवलच असेल. आणि थकल्यावर चिखलात अंग सोडून पडताना किंवा उतारावर चिखलाची घसरगुंडी करताना जाणवेल कि 'आयुष्य म्हणजे दुसरं काय आहे?'
          
पावसाळ्यातील हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने पुन्हा बालपण जगण्याचा काळ असतो. तो अनुभवल्यावर तुम्ही काही वर्षांनी लहान होता. नवचेतना देणारा हा ऋतू निसर्गासोबतच आपल्या मनावर साचलेली धूळ देखील धुवून काढतो. प्रसन्न ठेवतो, ताजेतवाने करतो. खऱ्या अर्थाने तुमच्या संवेदना जिवंत ठेवतो. जर या संवेदना जिवंत असतील तर वेगळा सांगायची गरज नाही आणि नसतील तर या पावसाळ्यात पुन्हा एकदा जन्म घेऊन नक्की बघा. 

- अभिजित इंजल
Image Courtesy - Google.com

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.
संपर्क  :Email : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla