Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
श्री'ची प्राणप्रतिष्ठापना - श्रीगणेश पूजनाचा विधी.
Puja Vidhi

 श्री'ची प्राणप्रतिष्ठापना - श्रीगणेश पूजनाचा विधी.

Ganesh Murti 75श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करावयाची असल्याने घरातील वातावरण प्रसन्न असावे. या दिवशी करावयाच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या पूजा साहित्याची जमवाजमव शक्यतो आदल्या दिवशी रात्री करून ठेवावी. फक्त पूजेसाठी लागणारे पाणी, पंचामृत , नैवेद्य वगैरे तयारी स्नानानंतर शुचिर्भूत होऊन करावी. जेथे गणपती बसवायाचा ते स्थान झाडून पुसून स्वच्छ ठेवावे. शक्य आहे तेथे सारवण करावे, रांगोळ्या काढाव्या, सजावट अगोदरच करून ठेवावी. येथे रंगीत पाट मांडावा. पूजेसाठी आणावयाची शाडूची गणेशमूर्ती मूर्तिकाराकडून घरी आणताना ती वस्त्राने झाकून आणावी. आणताना ती वाजत गाजत व जयजयकार करीत आणावी. घरात मूर्तीचा प्रवेश होण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळ तिच्यावर तांदूळ व दूध - पाणी ओवाळून स्वागत करावे. ओवाळलेल्या वस्तू बाहेर टाकाव्या. मूर्ती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे. मूर्तीस व मूर्ती आणणाऱ्यास कुंकू लावावे. मूर्तीला सुवासिनींनी औक्षण करावे. त्यानंतर मूर्ती घरात आणून सुरक्षित जागी पाटावर ठेवावी. ती ठेवण्यापूर्वी पाटावर थोड्या अक्षता पसराव्या. अक्षता या असणार्थी ठेवायच्या असतात. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूजा झाल्यानंतर रोज सकाळी व संध्याकाळी मूर्तीची पूजा - आरती करावी व वेगवेगळा नैवेद्य दाखवावा.

गणपतीची षोडषोपचारे पूजा :
या दिवशी पूजा करणाऱ्याने प्रत:काळी स्नान करावे. सोवळे असल्यास सोवळे नेसावे नाहीतर धूतवस्त्र नेसावे. घरात देव असतील तर प्रथम देवपूजा करावी इतर नित्यकर्म करीत असाल तर तीही करावीत. त्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य पूजास्थानी नेऊन ठेवावे.

षोडषोपचार पूजेसाठी लागणारे साहित्य :

उपकरणे : तांब्याचा तांब्या, फुलपात्र , संध्येची पळी, एक लहान व एक मोठे ताम्हण , समई, निरांजन, पंचामृत पात्र, उदबत्ती घर, नैवेद्याचे पात्र, पूजा करणाऱ्यासाठी आसन(पाट - चटई) , श्रीगणेशमूर्तीसाठी चौरंग किंवा पाट.
उपचारांचे साहित्य :

चंदनाचे गंध, शेंदूर, अष्टगंध, हळदकुंकू, अक्षता, सुवासिक अत्तर, तांबडी फुले, दुर्वा , कमळ, यज्ञोपवीत( जानवेजोड ), वस्त्र , उदबत्ती, धूप, कापूर, नैवेद्य (पेढे , मोदक , गुळखोबरे), पंचामृत (दूध , दही, तूप, दूध आणि साखर यांचे मिश्रण ) , सुपारी , फळे आणि पत्री .

श्रीगणपतीला २१ पत्री वाहावी असे शास्त्र सांगते. पण आज शहरात ही सर्व प्रकारची पत्री मिळत नाही. म्हणून तुळस, बेल , माका, दुर्वा , धोत्रा , शमी,कण्हेर , रुई , मखा , जाई, केवडा व हादगा आदी सहज मिळणारी पत्री शक्यतो मिळवावी.अन्यथा दुर्वा , बेल , लाल रंगाची फुले वाहावी. चंदनाचा गंध अगोदरच सहाणेवर घासून तबकडीवर तयार ठेवावा. पूजेची तयारी करूनच पूजेला बसावे म्हणजे वारंवार उठबस करावी लागणार नाही व पूजेतही खंड पडणार नाही.
पूजेला सुरुवात करण्यापूर्वी श्री. गणपती बसवायच्या स्थानी समई ठेवून ती प्रज्वलित करावी. समईची जागा सोयीची असावी. पूजा करणाऱ्याने कपाळी गंध लावावा. कुलदेवता , इष्टदेवतांना नमस्कार करावा. पूजा विधी यथासांग पार पडू देण्याबद्दल प्रार्थना करावी. हात जोडून नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून एका ताम्हणात देव्हाऱ्यातील घंटा घ्यावी व ताम्हण पूजा स्थानी ठेवावे. तांब्याचा तांब्या भरून ठेवावा. (अभिषेक करायचा असल्यास एक पातेले पाण्याने भरून ठेवावे.) नंतर देवाची प्राणप्रतिष्ठा ज्या पाटावर करायची त्या पाटावर अक्षता पसराव्या व त्यावर श्रीगणेशाची मूर्ती अलगद ठेवावी. मूर्तीवरील पांघरलेले वस्त्र बाजूला काढून ठेवावे. शंख पाण्याने भरून ठेवावा. त्यानंतर आचमन , प्राणायाम , प्राणप्रतिष्ठा करावी नंतर पूजेचा संकल्प करून शंख, घंटा व कलशाची पूजा करावी. ध्यान करावे मग षोडषोपचार करावे. पूजेपूर्वी करावयाचे हे विधी म्हणून त्यास प्रारंभिक विधी म्हणतात. कोणत्याही नैमित्तिक पूजेपूर्वी ते करायचे असतात. त्यात कर्मकांडापेक्षा भाव अधिक आहे म्हणून ते करावेत.
Sankalp - Ad - Sept 2016
प्रारंभिक विधी :
आचमन :
पूजा करणाऱ्या व्यक्तीने प्रथम गणेश मूर्तीसमोर आसन घालावे. व त्यावर मांडी घालून बसावे. गणेशमूर्तीला मनोभावे नमस्कार करावा. फुलपात्रात पाणी घेऊन केशवाय नम:। नारायणय नम:। माधवाय नम:। हे तीन नाम उच्चरून प्रत्येक नामाच्या वेळी पळीने उजव्या हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन ते प्राशन करावे. गोविंदाय नम:। हे नाम उच्चारताना हातात पळीभर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे. हात जोडावे व पुढील नामांचा उच्चार करावा : वैष्णवे नम:। मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः ।वामनाय नमः । श्रीधराय नमः । हृषीकेशाय नमः । पदमनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेंद्राय नमः । हृदये नमः । श्रीकृष्णाय नमः ।

प्राणायाम :
तीन वेळा पूरक , कुंभक , रेखक करावे. त्यावेळी गायत्री मंत्राचा उच्चार करावा. तो येत नसल्यास ओम गंगणपतये नमः । हा सोपा मंत्र म्हणावा. त्यावेळी डोळे मिटलेले असावे.

प्राणप्रतिष्ठा :

देवमूर्तीत देवत्व संचारीत व्हावे म्हणून हा विधी करतात. प्राणप्रतिष्ठा करताना दुर्वा किंवा फुल श्रीगणेश मूर्तीच्या पायाला स्पर्श करून ठेवावे. श्रीगणपतीच्या नेत्रांना दुर्वेने तुपाचा स्पर्श करावा. त्यावेळीही ओम गंगणपतये नमः । या मंत्राचा उच्चार करावा व मूर्तीत प्राण प्रतिष्ठित व्हावे अशी श्रीगणेशास मनोभावे प्रार्थना करून गूळ -खोबऱ्याचा किंवा अन्य पेढे मोदक यांचा नैवेद्य दाखवावा.

संकल्प :
उजव्या हाताच्या ओंजळीत पळीभर पाणी घेऊन पुढील संकल्प म्हणावा व पाणी ताम्हणात सोडावे.
श्रीगणपती देवता प्रित्यर्थ यथाज्ञानेन यथामीलित
उपचारद्रव्ये: षोडषोपचार पूजनं अहं करिष्ये । (पाणी ताम्हणात सोडावे )

हात जोडून पुढील गणेश प्रार्थना मनोमन म्हणावी.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।
श्रीमन्महागणपतये नमो नमः ।

कलशपूजा :
पाण्याने भरलेल्या कलशावर उजवा हात ठेवून पुढील श्लोक म्हणावा. नंतर गंध , अक्षता , फुल बाहेरून वाहावे.
गंगेचं यमुने चैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु ।।
कलशदेवताभ्यो नमः । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ।।

शंखपूजा :
प्रथम शंख पाण्याने भरावा. शांखाय नमः । सकल पूजार्थे गंध तुळसीपत्र समर्पयामी । असे म्हणून शंखास गंध व तुळशी वाहावी.

घंटा पूजा :
घंटायै नमः । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि । असे म्हणून घंटेस गंध , फुल व अक्षता वहाव्या आणि घंटानाद करावा.

दीप पूजा :
दीपाय नमः । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि । असे म्हणून समईस गंध , अक्षता व फुले वहावी.

शुद्धीकरण :
यानंतर शंखातील पाण्यात तुळशीपत्र बुडवून त्या पाण्याचे स्वत:वर तसेच सर्व पूजासाहित्यावर प्रक्षोण (शिंपडावे ) करावे. मग श्रीगणेशाचे डोळे मिटून ध्यान करावे व आवाहनाचा मंत्र म्हणावा. तो येत नसेल तर गणपतीने पुजेस्तव यावे अशी प्रार्थना करावी. नंतर "शांतो भव, सुप्रसन्नो भव, वरदो भव, सुप्रतिष्ठो भव " असे म्हणावे.

षोडषोपचार:

आवाहन :
श्रीगणपतये नमः । आवाहनार्थे पुष्पम समर्पयामि । श्रीगणपतीस फुल वहावे.
आसन :
श्रीगणपतये नमः। आसनं समर्पयामि । असे म्हणून श्रीगणेश मूर्तीच्या पाटावर अक्षता वहाव्या.
पाद्य :
श्रीगणपतये नमः । पाद्यं समर्पयामि । पळीने पाय धुण्यासाठी ताम्हणात पाणी सोडावे .
अर्ध्य : श्रीगणपतये नमः । अर्ध्यं समर्पयामि । पळीने हात धुण्यासाठी ताम्हणात पाणी सोडावे.
आचमनीय :
श्रीगणपतये नमः । आचमनीयं समर्पयामि । चूळ भरण्यासाठी पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.
स्नान :
हा उपचार करताना पाळीऐवजी दुर्वांकुराचा उपयोग करावा. हा उपचार करताना गणपतीस प्रथम शुद्धोदकाने ( शुद्ध पाण्याने) व नंतर क्रमश: पंचामृताने तसेच गंधोदकाने स्नानाचा उपचार अर्पण करावा व शेवटी पुन्हा शुद्धोदकाने हा विधी पूर्ण करावा. हा विधी क्रमश: पुढील प्रमाणे करावा :
शुद्धोधक स्नानं समर्पयामि । असे म्हणून दुर्वांकुराने हलकेच पार्थिव मूर्तीच्या पायावर शुद्ध पाणी शिंपडावे.
पंचामृत स्नानं समर्पयामि । असे म्हणून दुर्वांकुराने पंचामृत शिंपडावे. त्यानंतर पळीभर पाण्यात गंध , सुगंधी द्रव्ये घालून ते पाणी दुर्वांकुराने गंधोदक स्नानं समर्पयामि ।असे म्हणून अर्पण करावे. त्यानंतर पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पयामि । असे म्हणून शुद्ध पाणी शिंपडावे.
या उपचारास जोडूनच श्रीगणपतीस गणपत्यथर्वशीर्षानें अभिषेक करावा. ते शक्य नसल्यास श्रीगणेशाच्या अष्टोत्तरशत नामावलीतील एकेक नाम उच्चारून श्रीगणेशास दुर्वा वहाव्या.

वस्त्रोपवस्त्र :
कापसाची वस्त्रे वहावी. ती नसल्यास अक्षता वाहव्या. त्या वाहताना पुढील मंत्र म्हणावा. श्रीगणपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान समर्पयामि ।

यज्ञोपवीत :
श्रीगणपतये नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि। हा मंत्र म्हणून जानवीजोड शुद्धोदकात भिजवून वहवा. तो डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला घालावा. तो नसल्यास यज्ञोपवितार्थे अक्षतान समर्पयामि । असे म्हणून अक्षता वहाव्या.

गंध : गंधं समर्पयामि । हळदकुंकू, चंदनाचा गंध अर्पण करावा.

पुष्प : पुष्पम समर्पयामि । फुलं व पत्री वहावी.

धुपं : धुपं समर्पयामि । उदबत्ती लावावी. कापूर लावावा.

दीपं : दीपं समर्पयामि । निरांजन ओवाळावे.

नैवेद्य : नैवेद्य देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. तो देवापुढे ठेवण्यापूर्वी त्याखाली पाण्याचे चौकोनी मंडल करावे. त्यावर तुळसीपत्राने किंवा फुलाने शुद्धोदक पाण्याचे प्रोक्षण करावे (पाणी शिंपडावे ). मग प्राणाय स्वाहा , अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, सामानाय स्वाहा । या मंत्राने पाच वेळा नेवेद्याच्या ताटावरून देवाला उजव्या हाताने घास भरवल्यासारखे करावे. त्यावेळी डावा हात स्वतःच्या हृदयभागी ठेवावा. घास भरवल्यानंतर मध्ये देवाला पिण्यासाठी पाणी द्यावे. त्यासाठी पानीयं समर्पयामि। असे म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे. पुन्हा वरील पाच मंत्र म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करावा.
प्राणाय स्वाहा , अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, सामानाय स्वाहा ।श्रीगणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि । असे म्हणून ताम्हणात पळीभर उदक सोडावे.

महानिरांजन आरती :

गणपतीची व नंतर देवीची आरती प्रथम म्हणावी व नंतर आवडीच्या आरत्या म्हणाव्या. नंतर मंत्रपुष्प म्हणावे. स्वत:भोवती प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना म्हणावी. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.

पूजेच्या शेवटी क्षमायाचनेची पुढील प्रार्थना म्हणावी.
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम ।
पूजां चैव न जानामि , क्षमस्व परमेश्वर ।।
मंत्रहीनं क्रियाहीनं , भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तद्वस्तु मे ।।
गतं पापं , गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च ।
आगता सुखसंपत्ती पुण्यानं च तव दर्शनात ।।

प्रार्थनेनंतर " सर्व उपचारार्थे अक्षतान समर्पयामि " असे म्हणून चुकून राहून गेलेल्या एखाद्या उपचाराप्रीत्यर्थ अक्षता वहाव्या व " अनेन कृत षोडशोपचार पूजनेंन श्रीसिद्धिविनायक: प्रियताम ।" असे संबोधून ताम्हणात पळीभर पाणी सोडावे. दोनदा आचमन करावे व शेवटी साष्टांग नमस्कार घालावा.

उत्तरपूजा व विसर्जन
गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी देव हलविण्यापूर्वी करायची पूजा ती उत्तरपूजा होय. यावेळी धूत वस्त्र नेसून किंवा सोवळ्याने गणपतीची पंचोपचारी पूजा (गंध , फुल, अक्षता ) वाहून करावी. गणपतीला गूळ - खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. कुणाकडे दहीभाताचाही नैवेद्य दाखवतात. नंतर आरती करावी. मंत्रपुष्प म्हणावे. पुन्हा आवाहनं न जानामि । ही प्रार्थना करावी. त्यानंतर अनेन पंचोपचार पूजनेन श्रीगणेश देवता प्रियताम । असं म्हणून पळीने उदक सोडावे व इष्टकामप्रसिध्यर्थ पुनरागमनाय च । असा मंत्र म्हणून देवावर अक्षता वहाव्या. मूर्ती आसनावरच थोडी हलवावी. नंतर नेहमीचे कपडे घालून विसर्जनासाठी मूर्ती न्यावी.
मूर्ती विसर्जनासाठी नेताना गणपतीचे तोंड घराच्या दाराकडे करावे. मूर्तीची पाठ आपल्याकडे असावी. मूर्तीच्या आसनावर नंतर एक कलश भरून ठेवावा. त्यावर नारळ ठेवावा. ती जागा मोकळी ठेवू नये. विसर्जनानंतर घरी आल्यावर कलशाची आरती करावी. मंत्रपुष्प म्हणावे. सवडीने नारळ फोडून त्याचा प्रसाद वाटावा.

 

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla