Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पारंपारिक नवरात्रोत्सव
Utsav

पारंपारिक नवरात्रोत्सव

नवरात्रामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देवी म्हणजेच घट बसवण्याची वेगवेगळी पध्दत आहे. ही पध्दत जरी वेगळी असली तरी त्या मागची श्रध्दा, आपलेपणा, प्रेम हे सारखेच अनुभवायला मिळते. यावेळी महाराष्ट्र व गुजरात राज्यात नवरात्रामध्ये होणारी पूजा आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र :
ghat in navaratraमहाराष्ट्रात देशावर घट बसवण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी रुजवण घातलं जात. ती कसे घातले जाते ते पाहूयात. घट बसवणे म्हणजे रुजवण घालण्या आधी घरातल्या देवांची यथासांग पूजा केली जाते. ते करताना घरातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करुन पुसून प्रत्येक देव खायच्या दोन पानांवर ठेवले जातात याला आसन देणं म्हणतात. नंतर त्यांची पूजा केली जाते. नवरात्रात देवांना हलवता येत नाहीत. हे झाल्यावर एका टोपलीमध्ये पत्रावळीत थोडी ओली काळी माती घालून त्यात मूग, चवळी, मटकी, मका, कुळीथ, नाचणी, हरभरा, करडई, बाजरी, ज्वारी, भात, जव यापैकी कोणतीही नऊ धान्य मिसळावी.

यालाच रुजवण म्हणतात. एका मातीच्या घटात पाणी भरुन सव्वा रुपया व सुपारी घालून त्यावर खायची पाच पाने ठेऊन नारळ ठेवला जातो. त्या नारळाला काही जणी डोळे, कान, नाक, तोंड लावून सजवतात. पहिल्या दिवशी खायच्या पानांची माळ या घटाला घातली जाते. नंतरच्या दिवशी हादग्याच्या फुलांची माळ वा झेंडूच्या फुलांची माळ या घटाला घातली जाते. तर अष्टमीला कडाकण्याची माळ लावली जाते. ती करण्यासाठी गुळाच्या पाण्यात कणिक व बेसन घालून त्या पिठाची वेणी, फणी, जोडवी, बांगड्या, खायचं पान, हाताचा शिक्का आणि धपाटी असे मिळून नऊ प्रकार केले जातात. त्यानंतर ते तळून त्यांची माळ केली जाते. या कडाकण्याच्या माळेला व हादग्याच्या फुलांच्या माळेला नवरात्रात खरा मान असतो. घटासमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. घटावरील नारळ न हलवता दर दिवशी त्यात पाणी घातले जाते. तर रुजवणावर शिपंडले जाते. घरात घट बसवल्यानंतर नऊ दिवस उपवास ठेवला जातो. नऊव्या दिवशी देवीच्या घटाची पूजा करुन पुरण पोळ्यांचा नैवेद्य दाखवून घट हलवला जातो. घरातल्या देवांखालची खायची पानं व माळा विसर्जीत केल्या जातात. घरातले देव नविन वस्त्रांवर बसवून त्यांची पूजा केली जाते. तसेच कडाकण्याचा आणि घटावरील नारळाचा प्रसाद करुन वाटला जातो.

गुजरात :
garaba decoartion1घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तांदूळ, गहू वा मूगाने घरातील मातीचे कोरे मडके अर्ध्या पर्यंत भरले जाते. त्यात अखंड दिवा ठेवला जातो. तसेच या मडक्याच्या मागे देवीची मूर्ती वा फोटो ठेवला जातो. नंतर देवीची विधीवत पूजा केली जाते. नऊ दिवसांसाठी देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवतात. घरातील पुरुष, महिला यांपैकी एक जण नऊ दिवस कडक उपवास करतात. उपवास करणारे नऊ दिवसात चप्पल वापरत नाहीत. या उपवासामध्ये शिंगाडा, शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा या पदार्थाचं सेवन केलं जातं. नऊ दिवस सकाळ - संध्याकाळ देवीची आरती व स्तूती केली जाते. देवीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी घरातील महिला देवीसमोर फेर धरून कमीत कमी पाच वेळा तरी गरबा खेळतात. देवीची पूजा झाल्यावर गरबा खेळल्याने देवी ही आपल्या बरोबर नाचते अशी गुजराती महिलांची श्रध्दा आहे.
अष्टमीला देवीची महापूजा केली जाते. देवीसमोर होमहवन करण्यात येतं. त्या दिवशी घरातील लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच जण उपवास करतात. नवमीच्या दिवशी देवीला थाळीचा महानैवेद्य दाखवला जातो. तांदळाची खीर या नैवेद्यात असतेच. नऊ मुलींचे पूजन करुन त्यांना जेवण वाढून भेटवस्तू देण्याची प्रथा गुजराती माणसांमध्ये आहे.

बंगाली :
durga puja in bangalबंगाली देवी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दुर्गेचं रूप धारण केलेली, राक्षसाला मारणारी अष्टभुजा देवीची मूर्ती. बंगाली लोकांमध्ये प्रत्येकाच्या घरात दुर्गा देवीची स्थापना होत नाही तर सार्वजनिकरीत्या दुर्गा देवीची स्थापना करतात. सर्व बंगाली लोक एकत्र येऊन नवरात्रीचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. दुर्गादेवीची मूर्ती मोठी असते. डाव्या - उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, लक्ष्मी व कार्तिकेय यांचीही प्रतिष्ठापना करतात. सष्ठीला दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यावेळी पूजा करून होम-हवन केलं जातं. अष्टमीला कुमारिकापूजन केलं जातं. त्यावेळी एक ते अकरा वर्षाच्या वयोगटातील मुली बोलावून त्यांना दुर्गादेवीप्रमाणे सजवून त्यांची पूजा केली जाते. दस-याच्या दिवशी सर्व बंगाली लोक एकत्र येऊन आरती करतात आणि नंतर देवीचं विसर्जन करतात.

 

-आरती मुळीक परब.

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla