Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बोरन्हाण
Sanskruti - Rudhi

बोरन्हाण

bornhan - Rudhiनवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच नव्या बाळासाठीही. या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बाळाला बोरन्हाण घातलं जातं. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा व्यापक विचार यामागे आहे.वर्षभर साजरे होणारे विविध सण म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ तरी लांब राहण्याचं निमित्त. या निमित्ताने सर्व नातेवाईकांची गाठभेटही घेता येते. शिवाय, सणासमारंभांच्या माध्यमातून आपल्या रूढी परंपरा जपणं, हाही आपल्या पूर्वजांचा हेतू त्यात आहेच.

मकर संक्रात हाही असाच एक सण. नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच घरात आलेल्या नव्या बाळासाठीही. संक्रांतीला बाळासाठी काळं झबलं शिवून त्यावर खडी काढण्याची किंवा हलव्याचे दाणे चिकटवण्याची जुनी प्रथा होती. आता खडी काढण्यापेक्षा भरतकाम, पेण्टिंग करण्याकडे अधिक भर दिसतो. या दिवशी बाळाला हलव्यापासून बनवलेले मुकूट, बासरी, बाजूबंद, गळ्यातला हार, कंबरपट्टा इ. दागिने घातले जातात. आपल्याकडे एरवी काळा रंग निषिद्ध असला, तरी या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात.

पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मग, या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मधे बसवून बाळाचं औक्षण केलं जातं. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट गोळ्या इ. एकत्र करून घातलं जातं. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं. घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू दिलं जातं. बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही, असा एक समज आहे यामागे आहे.

केवळ करायची म्हणून ही प्रथा नाही तर याला शास्त्रीय कारणंही आहेत. थंडीच्या या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. संक्रातीला सुगड भरताना किंवा बोरन्हाणासाठी उसाचे करवे, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, तीळ आदींचा उपयोग केला जातो. याचं कारण म्हणजे त्या त्या ऋतूत येणाऱ्या पिकपाण्याचा उपयोग आपण पूर्वापार करत आलो आहोत. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा, असा व्यापक विचारही त्यामागे दिसून येतो.

बोरन्हणाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन चवींबरोबरच नव्या लोकांशीही त्यांची ओळख होते. बऱ्याच घरात मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहानमोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. आज कामाच्या निमित्ताने बाहेर राहणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी ही काळाची गरज बनली आहे.

आज माणसामाणसात बदलत्या जीवनपद्धतीमुळे काहीसा थकवा आणि त्याचबरोबर अंतर निर्माण झालं आहे. सणावारांच्या या निमित्ताने घरात आणि घराबाहेरही माणसामाणसातलं अंतर, त्याचबरोबर एकमेकांमधली स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर या भावनाही नष्ट व्हायला हव्या आहेत. हळदीकुंकू, तिळगुळ समारंभ, बोरन्हाण याच्या माध्यमातून नात्यात गोडवा निर्माण करून जोपासता येईल.

‘तिळगुळ घ्या गोड बोला‘ असं म्हणत एकमेकांना हलवा देण्याची पद्धत, या सणाला विविध वस्तू दान करणं, बाहेरगावी असणाऱ्या नातेवाईकांकडे तिळगूळ पाठवणं, आपले तांदूळ दुसऱ्याच्या आधणात शिजवण्याची कोकणातील प्रथा या सर्व गोष्टी सामाजिक एकोपा निर्माण करणाऱ्या आहेत. म्हणूनच काळाच्या ओघात फॉरवर्ड होतानाही आपल्या जुन्या परंपरा निभावत सामाजिक आणि शारीरिक आरोग्य समृद्ध होण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत.

साभार-हेमा आघारकर

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla