Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बाप्पाचे आवडते मोदक !
खाऊगल्ली लेख

  बाप्पाचे आवडते मोदक !

गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. चतुर्थीच्या दिवशी घराघरांतून मोदकांचा दरवळ येतो. तळलेले मोदकही नैवेद्यासाठी केले जातात. गृहिणी आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पासाठी करतात. खास तुमच्यासाठी मोदकांच्या काही रेसिपीज ...

modak small१. उकडीचे मोदक -
साहित्य : २ वाट्या तांदळाचे पीठ , २ वाट्या गुळ , एका नारळाचे खवलेले खोबरे , पाव वाटी खसखस, २ चमचे तूप , वेलची पूड.
कृती : खवललेले खोबरे व गुळ एकत्र करून शिजवावे. त्यात भाजून घेतलेली खसखस व वेलची पूड घालून घट्ट सारण करून घ्यावे.जितके तांदळाचे पीठ तितकेच पाणी मोजून घेऊन ते पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात किंचीत मीठ व २ चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर पातेले गॅसवरून खाली उतरवावे. व त्यात तांदळाचे पीठ घालून नीट ढवळून घ्यावे. पुन्हा गॅसवर पातेले ठेऊन २ वाफा आणून घ्याव्यात. पातेले खाली उतरवून उकड गरम असतानाच मळावी . उकडीची लिंबाएवढी गोळी घेऊन तिला हाताने वाटीचा आकार द्यावा.त्यात खोबऱ्याचे सारण भरून कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून तोंड बंद करावे.

वर टोक आणावे. खरे तर अशा २१ पाकळ्या आल्या तर मोदक उत्तम होतात पण जर तसे होत नसेल तर मोदाकास कमीत कमी ७-८ पाकळ्या तरी यायला हव्या. नंतर हे मोदक मोदक पात्रात किंवा इडली पात्रात २० मिनिटे वाफवून घ्यावेत. किंवा पातेल्यातील उकळत्या पाण्यावर चाळणी ठेऊन त्यावर मोदक ठेवावेत व झाकणी ठेऊन चांगले वाफवून घ्यावेत. तयार शिजलेले मोदक साजूक तुपाबरोबर खावेत.

 

modak1२. तळलेले मोदक -:
साहित्य: १ वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ, १ वाटी बारीक रवा, ४ चमचे तूप किंवा तेल, सारणासाठी १ खवललेला नारळ , २ वाट्या गुळ , पाव वाटी खसखस, वेलचीपूड , तळण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती :
रवा व मैदा तुपाचे मोहन व पाणी घालून घट्ट भिजवावा. हा गोळा एक तासभर ओल्या फडक्याने झाकून ठेवावा. खवलेला नारळ , गुळ , भाजलेली खसखस व वेलचीपूड घालून सारण घट्ट शिजवून घ्यावे. रवा - मैदा तासभर भिजल्यानंतर गोळा छान माळून घ्यावा. त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. एक एक गोळा पुरी प्रमाणे लाटून घ्यावा. ती पुरी हातावर घेऊन त्यावर सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. हे मोदक तुपात किंवा तेलात तळून घ्यावेत. मोदक खुसखुशीत होतात व बरेच दिवस टिकतात.
३.पुराणाचे तळलेले मोदक :
साहित्य : १ वाटी मैदा, १ वाटी रवा , ४ चमचे तूप व तेल , तळण्यासाठी तूप किंवा तेल.
२ वाट्या शिजवलेली चण्याची डाळ, २ वाट्या गुळ , वेलची पूड पाव चमचा, जायफळ पूड पाव चमचा, काजू, बदाम , बेदाणे आवडी प्रमाणे
कृती :
शिजवलेली चणाडाळ (त्यात पाणी नसावे) व गुळ एकत्र घट्ट शिजवून नंतर घोटून घ्यावे. त्यात वेलची पूड , जायफळ पूड , काजू , बदाम , बेदाणे घालून सारण तयार करावे. रवा - मैद्यामध्ये तूप किंवा तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावे. हा भिजलेला गोळा तासभर ओल्या फडक्याने झाकून ठेवावा. नंतर छान मळून त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. गोळे पुरी प्रमाणे लाटून त्यात पुराणाचे सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्यावा व तळून घ्यावेत.

४. शाही मोदक :
modak2साहित्य : २ वाट्या तांदळाचे पीठ , २ चमचे तूप , केशर
सारण : १ वाटी खवा, १ वाटी पिठी साखर , १ वाटी काजू - बदाम काप व बेदाणे , वेलची पूड
कृती :
उकडीच्या मोदकांच्या कृतीत सांगितल्याप्रमाणे तांदळाची उकड करून घ्यावी. त्यात चमचाभर दुधात भिजवलेले थोडे केशर मिसळून केशरी रंग आणावा .वाटीभर खवा छान परतून घ्यावा. त्यात पिठीसाखर , सुका मेवा , वेलचीपूड घालून सारण बनवून घ्यावे. उकड गरम असतानाच मळून त्याचे छोटे गोळे बनवावेत. प्रत्येक गोळ्याला वाटीचा आकार देऊन त्यात खवा - सुक्या मेव्याचे सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्यावा. मोदक पात्रात किंवा इडली पात्रात मोदक २० मिनिटे उकडून घ्यावेत.

हे शाही मोदक फार छान लागतात.

- रश्मी उदय मावळंकर

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla