Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुंबईतील “पंढरी”…
संकीर्ण लेख

मुंबईतील “पंढरी”… 

vithu mauli-205x300आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा दिवस. आपल्या या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी दरमजल करीत पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंग ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात या ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. प्रत्येक विठ्ठलभक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते. परंतु प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असे नाही. असंच काही मुंबईकरांच्या बाबतीत दिसून येते. मुंबई येथील भक्तांना या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशावेळी हे भक्त मुंबईतील वसलेल्या विठुरायाला भेट देतात. तेव्हा अशा या मुंबईतील पंढरीत टाळ-मृदुंगाचा नाद, वैष्णवांचा मेळा, भगवा पताका हे सारे दृश्य पाहायला मिळते. अशाच मुंबईतील प्रसिद्ध पंढरीचा म्हणजेच विठ्ठल मंदिराचा घेतलेला हा आढावा.

१)   श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, 
   
कुठे :- सायन(प)

१८९३ साली या मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना झाली असून शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील १२५ वर्ष जुनं असलेलं हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. तशी या मंदिराची गोष्ट जुनी आहे. श्रीधर दामोदर खरे महाराज हे १८६० च्या सुमारास मुबईत आले आणि शीवगावात स्थायिक झाले. ते पंढरपूरला वारीला गेले असताना तिथला सोहळा पाहून त्यांचे मन भारावून गेले आणि त्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या धातूच्या मूर्ती घरी देवपूजेसाठी आणल्या होत्या. परंतु, कालांतराने त्या चोरीस गेल्या. परत या मूर्ती कोणी चोरी करणार नाही म्हणून त्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या पाषाणमूर्ती घरात ठेवल्या व तेथेच विठुरायाचे कीर्तन करू लागले. तेव्हा शीवगावात आगरी, कोळी आणि भंडारी लोकांची वस्ती होती. या लोकांनी मूर्तीची मंदिरात स्थापना व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा खरे महाराज यांनी २७ फेब्रुवारी १८९३ म्हणजे फाल्गुन शुद्ध द्वादशी शके १८१५ रोजी स्थापन झाले.

    श्रीधर स्वामींची इच्छा होती कि, पंढरपूर येथे जशी विठ्ठलाची पूजाअर्चा होते तशी आपल्या मंदिरात पूजा व्हावी म्हणून त्यांनी पंढरपूर येथील रखुमाई मंदिरात पूजा करणारे पंढरीनाथ उत्पात यांना मुंबईत आणले व सर्व पूजेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. तसेच मंदिराचा कारभार व कामकाज पाहण्यासाठी ट्रस्ट स्थापन केला व त्याची जबाबदारी वासुदेव बळवंत सोमण यांच्याकडे दिली. यात महत्वाचे म्हणजे सोमणांची चौथी पिढी व उत्पात यांची चौथी-पाचवी पिढी नित्यनियमाने विठ्ठलसेवा करत आहे. पंढरपूर येथील मंदिरात होणारे दैनंदिन व वार्षिक उत्सव याही मंदिरात पार पडले जातात. त्याचबरोबर या मंदिरातील मूर्तीचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सणानुसार देवाची बदललेली वेशभूषा. नवरात्री, दिवाळी अशा अनेक दिवशी विठु-रखुमाईच्या मूर्तीला अनेक आभूषणे व अलंकार घालून नटवले जाते. पंढरीप्रमाणे वसंत ऋतूत मूर्तीला चंदनाचा लेप लावून नरसिंह, नीलकंठ, कृष्ण अशी रूपे दिली जातात. या मंदिरात वसंत ऋतूत एकादशीला चंदन उटी हा विशेष सोहळा पार पडला जातो.

2) विलेपार्ले विठ्ठल मंदिर:-
  कुठे:- तेजपाल स्कीम रोड, विलेपार्ले(पूर्व).
Ville-parle-vitthal-mandir

विलेपार्ले(पूर्व) येथील सुंदर आणि सुबक असे हे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर. हे मंदिर लक्ष्मीदास.गो.गोकुळदास तेजपाल यांनी आपली मुलगी ‘चि.लिली’ हिच्या जन्मानिमित्त हे मंदिर बांधले. हे मंदिर माघ शु.५.शके.१८५६ म्हणजे ८ फेब्रुवारी १९३५ साली बांधण्यात असून हे ७८ वर्ष जुनं मंदिर आहे. मंदिराची संपूर्ण व्यवस्था ‘विठोबा टेंपल ट्रस्ट’ तर्फे पहिली जाते. संपूर्ण मंदिर संगमरवरी असून ते पश्चिमाभिमुख आहे.
या मंदिरात प्रवेश करताना प्रथमच नजरेस पडते ते मंदिराची थोडक्यात माहिती देणारा शिलालेख. मंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या काळ्या पाषाणातल्या आहेत. याव्यतिरिक्त मंदिरात आपल्याला हनुमान, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, आणि विठ्ठलाची छायाचित्रे आहेत. आषाढी एकादशीला मंदिरात पार्ल्यातील शाळेच्या दिंड्या येतात. तसेच गेली १५ वर्षे मंदिरातील विठ्ठल-रखुमाईची नित्यनियमाने पूजा व मूर्तीस वेशभूषा करण्याचे काम हे पं.मेहता करतात.

 

३) श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर-
     कुठे- मोरी रोड, माहीम(प)

Mahim-vitthal-mandirमाहीम फाटक ते मोरी रोड या भागातील प्रसिद्ध मंदिर म्हणजे माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर. सुरवातीला माहीम हे बेट होते. १९१४-१५ साली माहीम परिसरात प्लेगची साथ पसरली होती यामुळे याची लागण लागून अनेकजण मृत्यूमुखी पडत होते. या बेटावरील लोकांचा जीव वाचवा यासाठी काही उपाय म्हणून या परिसरातील रहिवासी एक भगताकडे गेले. त्या भगताने उपस्थित रहिवाश्यांना त्या बेटावर विठ्ठल-रखुमाईचे मंदिर उभारण्यास सांगितले. त्याप्रमाणे रहिवाश्यांनी पंढरपूरला जाऊन तेथून विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आणली आणि विठ्ठल-रखुमाईचे मंदिर उभारले. तेव्हापासून या परिसरातील प्लेगची साथ नष्ट झाली. असे हे पावन मंदिर कोळी बांधवांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. ९६ वर्षे जुनं मंदिर असून मंदिराची स्थापना १९१६ साली करण्यात आली. मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम नजरेस पडते ती सुंदर गणेशाची आणि गरुडाची मूर्ती. मंदिराच्या मुख्य गाभा-यात काळ्या पाषाणातील विठ्ठल-रखुमाई यांची मूर्ती आहेत. त्याचबरोबर विठ्ठल-रखुमाई मूर्तीच्या उजव्या बाजूस श्री दत्त तर डाव्या बाजूस साईबाबांची संगमरवरी मूर्तीचे हि दर्शन घेता येते. प्रथम मंदिर कौलारू असून जसं जसं मंदिराचा कारभार वाढत गेला व ट्रस्टी बदलत गेले तसं तसं मंदिराचा विकास होत गेला आता मंदिरात मुख्य सभागृह असून मंदिरातील या सभागृहात विवाह, होम-हवन असे अनेक कार्यक्रम केले जातात. आषाढी एकादशीला अनेक भाविकांची गर्दी या मंदिरात दिसून येते. अनेक सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम मंदिरात पार पडले जातात.

 

 ४) विठ्ठल रखुमाई मंदिर, प्रतिपंढरपूर-

कुठे:- वडाळा बस डेपोजवळ, कात्रक रोड, वडाळा(पूर्व).Wadala-vitthal-mandir

मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी हे मंदिर. मंदिर पुरातन असून ३९७ वर्षे जुने आहे. या मंदिराच्या स्थापनेविषयाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. पूर्वी मुंबई हि सात बेटांची होती. त्यातील वडाळा हे एक बेट वा गाव. वडाळा गाव हे प्रसिद्ध होते ते येथील मिठागरांसाठी. अशा या मिठागरात लमाणी, शेतकरी, कोळी, आगरी अशी अनेक लोक राहत होते. मिठाचा व्यापार करणे या त्यांचा व्यवसाय. व्यापार करणारे व्यापारी हे विठ्ठलाचे आणि तुकाराम महाराजांचे भक्त असून ते नित्यनियमाने वारीला पंढरपूरला जात असेच. एक दिवशी काम करताना या मिठागरात काम करणा-या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. सदर घटना व्यापा-यांनी तुकाराम महाराजांना सांगितली त्यांनी सांगितले या मुर्त्या ज्या ठिकाणी सापडल्या त्या ठिकाणी विठ्ठल-रखुमाईचे मंदिर स्थापन करा. व्यापा-यांनी त्या परिसरात एक तळ होतं तेथे मंदिर उभारले. मंदिराचा विकास होत गेला तस-तसे या तलावावर भर घालून मंदिराचा विस्तार वाढवण्यात आला असून मंदिराचा कळस हा भागवतभक्त सोनोपंत दांडेकर यांनी बसवला होता. मुंबईतील ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे. मंदिरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी दिसून येते. मुंबईतील कुलाबा आणि अनेक ठिकाणाहून येथे वारक-यांच्या दिंड्या येतात. जत्रेचा उत्साह ही असतो. असे हे मंदिर पूर्वाभिमुख असून संपूर्ण संगमरवरी आहे. मंदिरात प्रथम प्रवेश करताना आपल्या नजरेस पडते ती काळ्या पाषाणातील गरुड देवाची मूर्ती. पुढे गेल्यानंतर मुख्य गाभा-यात दर्शन घडते सुंदर काळ्या पाषाणातील विविध आभूषणे आणि अलंकाराने नटलेली विठ्ठल-रखुमाईची मूर्ती. या मंदिरच्या उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर असून डाव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे तसेच हनुमानाचेही मंदिर आहे. मंदिरात पहाटे काकड आरती, दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता आरती तर रात्री ९.३० वाजता शेजारती होत असून दररोज सायंकाळी ५ ते ७ वाजता आणि रविवारी ४ ते ७ हरिपाठ प्रवचन असा हा मंदिराचा कार्यक्रम असतो. दशमीपासून भजन सुरु होऊन ते आषाढी एकादशीच्या रात्री पर्यंत भजन सुरु असते. आषाढीला लाखो वैष्णवांचा मेळा भरतो संपूर्ण मंदिर हरिनामाच्या जपाने दुमदुमून जातो. मंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची पूजा आषाढी एकादशीला राजकीय पुढारी व्यक्तींच्या हस्ते केली जाते.

५) विठ्ठल-रखुमाई मंदिर-
   कुठे- वांद्रे(प).

Bandra-vitthal-mandirवांद्रे(प) येथील ७३ वर्ष जुने विठ्ठल-रखुमाई मंदिर. संत सेना नाभिक समाजाने उभारलेली हि वास्तू. संत सेना महाराजांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू केवळ भक्तिकेंद्र राहिले नसून रंजल्या-गांजल्यांचे मदतकेंद्रही बनले आहे. अशा या मंदिरात पतपेढी असून अल्पखार्चात विवाह सोहळा पार पाडण्याचे कार्यालय आहे. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी वेळी ह.भ.प बाळाभाऊ तुपे यांनी विठ्ठल मंदिराची कल्पना मांडली. अनेक प्रयत्नानंतर १९३७ मध्ये ७५० चौरस वारांचा भूखंड मिळाला. मंदिर उभारण्याच्या या कल्पनेला अनेकांचे हातभार लाभले. अखेरीस ९ जानेवारी १९४० साली मंदिरात विधिवत विठ्ठल-रखुमाई मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९९० साली सुवर्णमहोत्सव झाला. तर गेल्या दोन वर्षापूर्वी या मंदिराला करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते दोन किलो सोन्याचा कळस चढवण्यात आला. मंदिरात आतापर्यंत अनेक बुवांचे कीर्तन झाले असून ह.भ.प श्री.पांडुरंग बुवा आव्हाड, ह.भ.प श्री उद्धव बुवा जावडेकर, ह.भ.प.राजू बाबा शेख, ह.भ.प श्री. परशुराम बुवा मालगुंडकर इत्यादीचा यात समावेश आहे. मंदिरात सिद्धकला भजनी मंडळ,वांद्रे यांचा दर शुक्रवारी सायंकाळी ४ ते ६ भजनाचा, दर रविवारी सकाळी ८ ते ८.३० वाजता बालोपासनेचा कार्यक्रम तर दर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वांद्रे नाभिक महिला भजनी मंडळांचा हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम असतो. अशा या मंदिरात आषाढी एकादशीला गेली ६९ वर्षे मुंबईतील अनेक दिंड्या दाखल होत असून मंदिरात या दिवशी मोठा कार्यक्रम असतो.

 

६) विठ्ठल-रखुमाई मंदिर-
    कुठे- भायखळा(प)

भायखळा(प) येथील परिसरातील पुरातन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १२४ वर्षापूर्वी करण्यात आली होती. या मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीबरोबरच हनुमान, गणपती यांच्या मूर्तीदेखील आहेत. हे मंदिर कुसामा काळे यांच्या स्थापन केले असून गोपाळ कांगणे यांचा या मंदिराला मोठा हातभार लाभला आहे. या मंदिरात अनेक कार्यक्रम असतात. मंदिरात ४१३ अखंड हरिनाम सप्ताह झाले असून एकूण ६ हजार ५२ कीर्तनकारांचे कीर्तन झाले आहे. वैकुंठवासी जोग महाराज, घनश्याम बाबा महाराज, सावळाराम बाबा पिंपळवाडीकर, मामासाहेब दांडेकर अशा दिग्गजांची कीर्तने या मंदिरात झाली आहे. मंदिरात नित्यनियमाने सकाळी १० ते १२ महिला भजन, दुपारी १ ते ४ पोथीवाचन, संध्याकाळी ६ ते ७ महिला हरिपाठ नंतर आरती असा दिनक्रम असतो. तर, प्रत्येक एकादशीला महिला भजन मंडळाचे भजन असते. तसेच गोकुळाष्टमी, रामनवमी इत्यादी सणाला अखंड हरिनाम सप्ताह तर तुकाराम बीज या दिवशी एक हरिनाम सप्ताह असतो.

७) विठ्ठल-रखुमाई मंदिर, देवीपाडा-
    कुठे:- देवीपाडा, बोरिवली(पूर्व)

या विठ्ठल-रखुमाई मंदिराची स्थापना १९८० साली झाली. ३३ वर्षे जुने असलेलं हे मंदिर विठ्ठल-रखुमाई सेवा समिती ट्रस्टचं असून बोरिवली येथील देवीपाडा या भागात आहे. स्थानिक विठ्ठलभक्तांनी एकत्र मिळून मंदिर उभारले. मंदिराच्या इतिहासाबद्दल कथा आहे. विठ्ठलभक्त उत्तेकर यांना खुद्द विठुरायाने स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. या साक्षात्कारानंतर त्यांनी मंदिराच्या ठिकाणी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती स्थापन केली असून इतर स्थानिक विठ्ठलभक्तांनी त्यांना सहकार्य करून मंदिराची बांधणी केली. त्यानंतर २००१ साली शरद सावंत, शिरीष चौगुले, कृष्णा सावंत यांच्या प्रयत्नांनी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मंदिरात प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कीर्तन असतात. त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरात ३ दिवस उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात प्रसाद महाराज बडवे, धोंडोपंतदादा शिरवळकर, प्रताप महाराज शिर्के, कोकण दिंडी समाज, रत्नागिरी-वरळीचे नामदेव महाराज घोलप, शिवाजी महाराज बुधकर, मनोहर मोरे यांसारख्या प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचन आयोजित केले जाते. आषाढी महिन्यात पालखी सोहळासुद्धा साजरा केला जातो. या मंदिरात दररोज सकाळी ४ वाजता काकड आरती, सायंकाळी ३ ते ५ वाजता महिला मंडळाचे भजन असते असून रात्री ७ ते ८ वाजता विठ्ठलाची शेजारती होते. या मंदिरातील सर्व कार्यक्रम, उत्सव व सोहळे सोपान देशमुख, विजय देशमुख, संतोष दळवी, मारुती चोपडेकर, बाळ नाईक आणि ह.भ.प.मनोहर हळदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले जातात. या मंदिरातील विठ्ठल-रखुमाईची मूर्ती हि नवसाला पावणारी आहे अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे नेहमीच भक्तांची वर्दळ असते.


-प्रसाद प्रभाकर शिंदे.

 

 

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla