Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
स्टाईलीश वाचन
विद्यानगरी लेख

'स्टाईलीश  वाचन'

j0409270वाचन ही तशी व्यक्तीपरत्वे कमी अधिक आवड (आणि सवड) असणारी बाब. मात्र तरीही प्रत्येक पिढी 'आजकालची मुले वाचतच नाहीत' असे म्हणतच असते. त्याला खरंच नाइलाज आहे. मात्र असे असले तरी आजकालची मुले वाचतच नाहीत ही ओरड काही तितकिशी  खरी नाही. मुले ( इथे मुले आणि मुली या दोन्ही अर्थाने हा शब्द योजला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) वाचतात, खरच वाचतात.हो त्यांच्या वाचनाची पद्धत वेगळी असू शकते (कदाचित). म्हणजे 'चिंता करतो विश्वाची' असा धीर गंभीर चेहरा करत , आजूबाजूला आपल्या किमान एक पंचमांश वजन भरतील, अशा दोन चार कादंबऱ्या आणि चारशे किंवा अशीच 'काहीशे' पानांची 'जड' कादंबरी दोन्ही हाताने पेलवत , मध्येच नाकावरचा चष्मा तर्जनीने सरळ करत, डुगूडुगू हलणाऱ्या आणि वारा कमी आणि आवाज जास्त करणाऱ्या टेबल फॅनचा वारा खात , आकाशवाणीवरील 'अभी ना जाओ छोडके के दिल अभी भर नही' च्या दर्द भऱ्या गीतात हरवत, एक हात 'इतिहास जमा' झालेल्या खुर्चीत स्वत:ला सावरत, चेहऱ्याचा अर्धा भाग जवळपास त्या कादंबरीने 'खाऊन' टाकलेला आहे, अशा 'प्रेक्षणीय' स्थितीत नसतील(च) वाचत.

आमच्या पिढीचे वाचन स्टायलिश झाले आहे. जसे की प्रवास करतानाचा तो मोकळा वेळ वाया जाऊ नये म्हणूनओसंडून वाहणाऱ्या ट्रेन मध्ये (अगदी चौथ्या सिटवर बसून देखील) मस्तपैकी पायावर पाय टाकून डोळ्यावरील गॉगल अजिबात दूर न करता,वारा कापत सुसाट धावणाऱ्या ट्रेनच्या रूळ बदलण्याच्या ह्रिदमसोबत, कानातील इयरपॅडवर ' सलिमला सोडून डिस्कोत जाणाऱ्या अनारकलीच्या' लटक्या झटक्यांसोबत ,हातातील 'आयपॅड', 'टॅब',लॅपटोप' आणि एवढेच नव्हे तर सदा सर्वकाळ हातात खेळणाऱ्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर आमची पिढी वाचतच असते. तळहातावरील त्या इवल्याशा पडद्यावर लाखो शब्द, हजारो लेखक, शेकडो पुस्तके एकाच ठिकाणी सुखनैव नांदत असतात.

संगणकाने घरात आणि इंटरनेटने संगणकात प्रवेश केल्यापासून माझ्या पिढीचे वाचन वाढले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अगदी फेसबुक वरील वॉलपोस्ट पासून ते क्लासीक नोवेल्स सगळे काही ऑनलाईन आम्ही वाचू लागलो आहोत. गेल्या काही वर्षापासून तर इंटरनेटच्या 'मायाजालावर' इंग्लिश सोबत हजारो मराठी पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. यात धार्मिक पुस्तकांपासून ते अभिजात दर्जेदार साहित्यापर्यंत सर्व विषयांचा समावेश आहे.
मराठी साहीत्य आपापल्या पद्धतीने या नव्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकाशक आपल्या पुस्तकांची 'इ आवृत्ती' सुद्धा आवर्जून प्रकाशित करताना दिसतात.त्याचसोबत विविध सोशल नेट्वर्किंग साईट वर आपल्या आगामी पुस्तकांबद्दल पूर्वप्रसिद्धी करतात.अनेक साहीत्य संस्था आणि हौशी मित्र मंडळींनी मराठी साहीत्य सर्वदूर पोहोचावे यासाठी वेबसाईट सुद्धा तयार केल्या आहेत.'प्रोजेक्ट गटेनबर्ग' मुळे हजारो 'इ बुक्स' मोफत उपलब्ध झाली आहेत. आणि त्यात दिवसागणिक भर पडतच आहे.वाचून झाल्यानंतर डिलीट करण्याची व आवश्यकता असल्यास पुन्हा 'डाउनलोड' करण्याची सोय असल्याने नेटकरींना इ बुकचा लळा अधिकच लागला आहे.

यासोबत फेसबुक सारख्या व्हर्चुअल कट्ट्यावर सुद्धा आपल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी  अनेक प्रतितयश संपादित (आणि नवोदितसुद्धा) लेखक मंडळी आवर्जून आपले फ्रेंड सर्कल (पक्षी: वाचक मंडळ) वाढवताना दिसते. मोठ्या प्रमाणात साहित्यिक चर्चा (गंभीरपणे) घडताना दिसतात.यात कविता महाजन, राजन खान, संदीप खरे,ना. धो., रंगनाथ पाठारे ,अनिल अवचट,प्रज्ञा पवार सह अनेक मान्यवर साहित्यिक प्रामुख्याने दिसतात.समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टी या कट्ट्यावर पोच करीत असतानाच त्यावरील आपली मते सुद्धा आवर्जून मांडतात, त्यावर विविध कॉमेंट्स  येतात, या मत प्रदर्शनातून अनेकांना आपल्या आगामी साहित्याची बीजेही अंकुरताना दिसतात.त्यामुळे आमची पिढी फक्त प्रकाशित झालेलेच साहीत्य वाचते असे नाही, तर त्या साहित्याच्या बीजारोपणापासून या प्रवासात सहयात्री असते.

- किशोर अर्जुन
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

संबधित लेख- गुंफिते संस्कार फुलांची माला ...

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  :Email : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla